आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचा महिला पक्ष प्रवेश व सदस्य नोंदणी मेळावा संपन्न.
डॉ.सोनल कोवे मुळे पक्षाला नवी उभारी,महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण
आष्टी :-
आष्टी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशाने आणी महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे व सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने आणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाउपाध्यक्ष सौ.पुष्पा बुर्ले यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी व महिला पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर होते तर अध्यक्ष म्हणून महिला जिल्हाध्यक्षा डॉ.सोनल कोवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम होत्या.
कार्यक्रमात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीला सुरुवात झाली.
आष्टी येथिल अनेक युवक, युवती, महिला यांनी पुष्पा बुर्ले व प्रणय बुर्ले यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केले.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ.सोनल कोवे व तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत माहिती समजावून सांगितले व पक्षाच काम यापेक्षा अजून जोमाने वाढला पाहिजे याकरिता रीतसर मार्गदर्शन केले.
त्यावेळी जिल्हा सरचिटणीस लौकिक भिवापुरे, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.नोमेश जुवारे, जिल्हासंघटन सचिव डॉ.हेमंत भाकरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, महिला चामोर्शी तालुकाध्यक्ष रुपाली दुधबावरे, जिल्हासचिव कपिल बागडे, पुरुषोत्तम खेडेकर, बंडू मेश्राम, संदीप सोयाम, अशोक बुर्ले, रमेश बुर्ले आदी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
तर सर्व मान्यवरांचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्येंकटेश बुर्ले यांनी मानले.
रानडुकराने केला घात पोलीस हवालदार पती -पत्नीसह दोन्ही मुले ठार
वर्धा:-
रानडुकराने घात केल्यामुळे. एक हसरं चौकोनी कुटुंब संपले. वर्धा तालुक्यातील तरोडा येथे हा अपघात सोमवारी रात्री घडला. त्यात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी व दोन मुलं ठार झाले आहेत. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण आज सकाळी सात वाजता त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार वैद्य हे कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश ६ व मुलगी माही वर्ष ३ हे पण होते.
महाप्रसाद कार्यक्रम आटोपून ते आपल्या एम एच ४० ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीने परत निघाले होते. वर्ध्याकडे येत असतांना मांडगावजवळ रस्त्याच्या मधोमध रानडुक्कर गाडीपुढे आले. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाडी समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. मोठा अपघात घडला.
घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य व त्यांची मुलगी रुग्णालयात मरण पावले. रात्री ११ वाजता ही घटना घडल्याचे समजते. तरोडा हायवे वर हा अपघात घडला. टँकर एम एच ०९ सी व्ही २१८५ या गाडीस अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर ही गाडी वेगात धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगितल्या जाते.
अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे व काकडे हे पोहचले होते. जखमी झालेल्यांना प्रथम सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्या गेले होते.
अपघात घडल्याचे माहित होताच लगतचे गावकरी धावून आले. त्यांनी पोलीस विभागास माहिती देत रुग्णवाहीका बोलावून घेतली. त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्य हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
पण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवापण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवासी होते. एकाच अपघातात सर्व कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
अपघातग्रस्त कारची स्थिती समोरून चेंदामेंदा झाल्यागत आहे. सोमवारी रात्री झालेला हा अपघात भयावह असल्याचे घटनास्थळीचे चित्र आहे. या अपघातास कारण ठरलेला रानडुक्कर पण तिथेच ठोस बसल्याने मृत झाला.
रूंजीने घेतले पैकीच्या पैकी गुण व राज्यात आली प्रथम त्या गावासाठी ठरली गौरवाची बाब
साकोली : शहरातील जिल्हा परिषद इंग्रजी प्राथमिक शाळा क्र. २ येथील इयत्ता दूसरीची विद्यार्थीनी रूंजी संग्रामे ही भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी २०० गुण घेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. ही साकोलीसाठी अत्यंत गौरवाची बाब असून सर्वप्रथम साकोली गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी त्या मुलीचे विभागातर्फे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.
जानेवारी २०२५ ला भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता २ रीची रूंजी सुधाकर संग्रामे हिने अक्षरशः २०० पैकी २०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान राखला. ही साकोली शहरासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. रूंजी संग्रामे ही शासकीय शाळेतील विद्यार्थीनीने महाराष्ट्रात साकोलीचे नाव चमकविले त्याबद्दल पंचायत समिती, जि. प. शाळा साकोली केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, सहा. शिक्षक पल्लवी लुथडे, पी. एस. देशपांडे, उमेश भस्मे, आशा वलथरे, लता इळपाते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंगमोडे, उपाध्यक्ष सौ. बावणे, जि. प. केंद्रीय शाळा मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, शिक्षक एम. व्ही. बोकडे, चेतन बोरकर, टी. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, शालिनी राऊत, श्रद्धा औटी आणि साकोली मिडीया नेटवर्क व समस्त पंचायत समिती शिक्षकवृंद यांकडून रूंजी संग्रामे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नोंदीमध्ये 19000 क्विंटल धान्य, आणि प्रत्यक्ष गोदामात केवळ 3000 क्विंटल धान्य, उर्वरित धान्य कोणाच्या घशात
गडचिरोली:-
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था केंद्राच्या नोंदीमध्ये 19000 धान्य क्विंटल खरेदी दाखवलेली आहे. मात्र त्या ठिकाणी 3000 क्विंटल धान्य शिल्लक आहे. बाकी धान्य गेले कुठे? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. खरेदी केंद्रावरील बारदान्यामध्ये सुद्धा तफावत आढळून आलेली आहे. दीड कोटी रुपयाचा धान्य घोटाळा झाल्याचे संशय आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी केंद्राचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावून केंद्राला शील ठोकले आहे. या घटनेमुळे धान्य घोटाळा करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चालू वर्षाची खरेदी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. देऊळगाव येथील खरेदी केंद्रावर 2023 24 वर्षांमध्ये खरीप हंगामा बऱ्याच प्रमाणात अनियमितताआढळल्याचे माहिती आहे. खरेदी केंद्रावर 2024-25 या चालू हंगाम वर्षामध्ये याची सुद्धा चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे. जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी विविध कार्यकारी संस्था फेडरेशन खरेदी केंद्रावर चालू वर्षांमध्ये एकूण झालेली धान्याची खरेदी आणि शिल्लक धान्यसाठा याची चौकशी करावी यामुळे खरेदी केंद्रावरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही दिसून येईल असे सुद्धा सामान्य जनतेतून बोलले जात आहे.
९ एप्रील रोजी बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन
गडचिरोली - बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्क आरपीआय, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा व विविध संघटनाच्या वतीने ९ एप्रील २०२५ बुधवारला दुपारी १२ वाजता बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून रॅली काढून राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएम हटाओ ओबीसींची जातनिहाय जनगणना करा,
शेतकऱ्यासाठी एमसपी गॅरंटी कायदा लागू करा खाजगीकरण रद्द करून नोकर भरती सुरु करा, महापुरुषाचा वेळोवेळी अप अपमान करणे थांबवा आदी मागण्याकडे वेधण्यासाठी लक्ष राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात गडाचिरोली जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले आहे
समुह निवासी शाळेच्या एका खोलीत ठेवलेल्या साहित्याला कशी लागली आग ?
एटापल्ली : पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या समूह निवासी शाळेच्या एका खोलीला आज दुपारी 11 च्या दरम्यान आग लागली. आगीत जुने साहित्य जळून खाक झाले. उन्हाचा पारा फार भडकलेला नसताना आग कशी काय लागली ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि महत्वाचे म्हणजे त्याच खोलीत आग लागण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात समूह समूह निवासी शाळा चालविण्यात येत होती. गेल्या तीन वर्षापासून तांत्रिक कारणास्तव समूह निवासी शाळा बंद आहे. जिल्हा परिषद कडून चालवण्यात येणारा समूह निवासी शाळेचा उपक्रम बंद असला तरी तीन वर्षापूर्वी निवासी विद्यार्थ्यांसाठी आलेले साहित्य एका जुनाट खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. गाद्या, दऱ्या इत्यादी साहित्य या जुन्या खोलीत ठेवण्यात आले होते. सदर साहित्य तीन वर्षांपूर्वी ठेवण्यात आले आहे. या साहित्याची गरज नसल्याने साहित्याची कुणाकडून तपासणी झाली नाही. आज सकाळी 11 च्या दरम्यान साहित्य ठेवण्यात आलेल्या खोलीतून अचानक धूर निघायला लागला. शाळेच्या बाजूलाच पंचायत समिती कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. धूर निघत असल्याचे पंचायत समितीत राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. सदरची सूचना पंचायत समितीला देण्यात आली. पंचायत समितीकडून नगरपंचायत एटापल्लीला कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे वाहन व कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत खोलीमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य जळून खाक झाले होते.
साहित्य जुने असले तरी नेमके किती किमतीचे साहित्य जळून खाक झाले हा तपशील पंचायत समितीकडून अद्याप जाहीर करण्यात आला नाही. खोलीचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे.
दुपारी अकराच्या दरम्यान लागलेली आग नेमकी कशामुळे लागली हा शोधाचा विषय झालेला आहे. शासकीय पातळीवर लागलेल्या आगीला शॉर्टसर्किटने आग लागली असे नेहमीच सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पंचायत समिती पुढे निर्माण झाले आहे आग कुणी लावली की आपोआप लागली याआगीचा शोध घेण्याची जबाबदारी पंचायत समितीवर आली आहे.
महिला प्राचार्य यांना सोशल मिडियाची धमकी देत वाहण चालकाने केला अत्याचार,व लुटले तीन लाख रुपये
चाळीसगाव :
फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत प्राचार्य असलेल्या महिलेवर वाहन चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच त्या महिलेकडून ३ लाख ३० हजार रुपये उकळले असून याप्रकरणी मध्यप्रदेशातील राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात रहीवास असलेल्या ३५ वर्षीय महिला दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्यात प्राचार्य आहे. त्या महिलेचा पती एका गुन्ह्यात कारागृहात असतांना पतीची मध्यप्रदेशातील संशयित राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण याच्याशी ओळख झाली. महिलेच्या पतीने चव्हाण यास संपर्कासाठी पत्नीचा मोबाईल नंबर दिला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये संशयित राजासिंग चव्हाण हा चाळीसगाव येथे एका पुढाऱ्याच्या ओळखीने चाळीसगाव येथे आला होता. त्यावेळी त्याने त्या महिलेची भेट घेतली होती. त्यानंतर महिलेच्या वाहनाचा चालक म्हणून काम करू लागला. डिसेंबर २०२४ मध्ये संशयित राजासिंग चव्हाण याने महिला महाविद्यालयात गेली असता, तेथे दारूच्या नशेत महिलेशी वाद घालून वाहनात बळजबरीने बसविले. त्यानंतर चाळीसगाव येथील एका लॉजवर नेवून त्याने प्राचार्य महिलेवर अत्याचार केला.
लॉजवरील, व्हिीडीओ, फोटो काढून ब्लॅकमेल करू लागला. हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत महिलेकडून सुमारे ३ लाख ३० हजार रूपये उकळले. याप्रकरणी फसवणुक झालेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलीसांना सांगितला. पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजासिंग चव्हाण याचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहेत
सराफा व्यापाऱ्याला लावला चोरट्यांनी चूना ! दीड लाखांची केली फसवणूक
गडचिरोली, एकीकडे सोन्याच्या दाराने उच्चांक गाठलेला असताना चक्क 'हॉलमार्क' प्रमाणित बनावट दागिने देत दाम्पत्याने सराफा व्यावसायिकालाच दीड लाख रुपयांनी गंडा घातल्याची घटना गडचिरोली शहरात सोमवारी (दि.7) उघडकीस आली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय संजय हर्षे यांचे चामोर्शी मार्गावर सराफा दुकान आहे. 4 एप्रिल रोजी दुपारी अक्षय हे घरी गेले होते. दुकानात वडील संजय वामनराव हर्षे होते. यावेळी एक दाम्पत्य दुकानात आले. त्यांनी 24.670 ग्रॅम वजनाची 'हॉलमार्क' प्रमाणित साखळी विक्री कःन 1 काळी पोत, 2 अंगठ्या व 2 जोड कर्णफुले, असे एकूण 1 लाख 45 हजार 590 रुपयांचे दागिने खरेदी केले. साखळीवर हॉलमार्क 916 असे चिन्ह होते. त्यामुळे संजय हर्षे यांना संशय आला नाही. या साखळीचे सोन्याच्या चालू बाजारभावाप्रमाणे 1 लाख 51 हजार 890 रुपये झाले. उर्वरित 6 हजार 300 रुपये हर्षे यांनी संबंधित दाम्पत्यास परत केले. दरम्यान, साखळीची 1 कडी कापून वितळवली असता, ती बनावट निघाली. त्यानंतर अक्षय हर्षे यांनी गडचिरोली ठाण्यात तक्रार केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशीः नकली दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याने अयोध्यानगर येथे राहत असल्याचे सांगितले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व साखळी अक्षय हर्षे यांनी गडचिरोली पोलिसांना दिली आहे. या फुटेजआधारे पोलिसांनी संशयित दाम्पत्याचा शोध घेऊन चौकशी केल्याची माहिती आहे.
सराफा व्यावसायिकाने तक्रार केली आहे. मात्र, त्या • सराफा व्यावसायिकाने तकार केला आहे. मात्र, त्या सुरु आहे. हे दागिने पूर्णतः बनावट आहेत की नाहीत, हे पडताळणीनंतर समोर येईल. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
-रेवचंद सिंगनजुडे, पोलीस निरीक्षक, गडचिरोली
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीच्या आवळल्या मुसक्या
एटापल्ली : शहरापासून जवळचअसलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचे तरुणाने लैंगिक शोषण केले. याबाबत ७ एप्रिल रोजी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, नानेश लुला कुमोटी (२४) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. नानेश याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत पीडितेच्या घरी माहिती झाली. त्यानंतर पीडित मुलीसह
पीडितेला आरोपीने वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्यामुळे तिने घरी सांगितले. यानंतर अत्याचाराला वाचा फुटली.
नातेवाइकांनी एटापल्ली ठाणे गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ (२), १७३ (२) अन्वये गुन्हा नोंदविला. यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून आरोपी नानेश कुमोटी याला जेरबंद केले. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोनि नीलकंठ कुकडे यांनी सांगितले.
आरोपीला पकडण्यात अपयश आल्याने बौद्ध बांधवांचा शांतीच्या मार्गाने आंदोलन
आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही - समाज बांधवांची आक्रमक भुमिका
चामोर्शी : तालुक्यातील आंबोली व किष्टापुर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लिल शब्द व मानवि गुप्तागांचे चित्र काढलेले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन आष्टी येथे दिनांक २६/०३/२०२५ रोजी पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांना तक्रार (फिर्याद) नोंदविण्यात आलेली होती परंतु पोलीस प्रशाषणाला आरोपीला पकडण्यात अजून पर्यंत यश मिळालेले नाही. म्हणून बौध्द अस्मीता रक्षण समिती येनापुर परीसर व समाविष्ठ असलेले समाज मंडळ यांच्या तर्फे दिनांक ०६/०४/२०२५ ला बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शांन्ततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले. याअगोदर तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले होते. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास अटक केली. परंतु पुन्हा आंबोली, किष्टापूर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले. त्यामुळे बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापूर यांच्या वतीने परिसरातील बौद्ध बांधवांनी येनापूर येथील बाजारपेठ बंद करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी येनापूर परिसरातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पोलीसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता.
जीव गेल्यानंतर अनखोडा - कढोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरील खड्डा बुजविणार काय ?
बरेच अपघात होऊनही शासनाचे दुर्लक्ष
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली- जैरामपुर मार्गावरील नाल्यावर पुलीयाच्या बाजुने
2023 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने खड्डा पडून दोन वर्षे झाले बरेचसे दुचाकीस्वार यांचे रात्रीच्या वेळी अपघात झाले तरीही अधिकारी लक्ष्य देउन काम करीत नाही शासकिय बांधकाम विभाग सुस्त झोपेत असल्याचे दिसून येते आहे
सदर पुलीयावरुन गडचिरोली जिल्यातील आमदार व खासदार
तथा अधिकारी या पुलावरुन आजपर्यंत प्रवास केलेला नाही त्यामुळे या बाबींकडे त्यांचे लक्ष नाही त्या खड्यात रात्रोचे सुमारास बरेच दुचाकीस्वार कोसळले आहेत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर शासनाला जाग येणार आहे काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे
या बाबीची त्वरित दखल घेऊन तो जीवघेणा खड्डा बुजवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे
मंत्री महाजनांचे महिला आयएएससोबत संबंध ? खडसेंचा दावा, शाहांकडे आहेत कॉल रेकॉर्ड
मुंबई:-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही महाजन यांची सीडी मिळाली आहे ना असे म्हणत खडसेंनी लवकरच शाहांना भेटून याबद्दल प्रश्न विचारेन, असे सांगितले. 'गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा' या शीर्षकाचा उल्लेख खडसेंनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता खडसेंच्या या आरोपांवर महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी पुरावा द्यावा, मी राजकारण सोडेन, असे आव्हान महाजन यांनी दिले. खडसे पुढे म्हणाले, माझ्या अमित शाहांसोबत बैठका होत असतात. मी त्यांना भेटून यावर चर्चा करेन. जर महाजन यांचे गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासले तर सत्य बाहेर येईल असे मला वाटते.
रात्री 1 वाजता फोन
खडसे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत अमित शाह यांनी महाजन यांना फोन केला होता आणि महिला आयएएसशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले होते. त्यानंतर महाजन यांनी आपल्या बचावात म्हटले होते की त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी बोलतो. पण शाह यांनी तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत असे सांगून त्यांना गप्प केले. तुम्हाला रात्री 1 नंतरही फोन आले आहेत. दररोज शेकडो कॉल येत आहेत. सीडी खरे सांगत आहे. तेव्हा शाह यांनी महाजन यांना स्पष्ट शब्दात विचारले होते की. त्या महिलेशी तुमचे काय नाते आहे?
पुरावे द्या, आता राजकारण सोडेन
आरोपांवर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, खडसेंनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, असे मी त्यांना आव्हान देतो. त्यांनी एकही पुरावा दिला तर मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेल. लोकांनी फालतू बडबड करू नये. कधी म्हणायचे मोबाईल हरवला, कधी म्हणायचे डेटा गायब झाला. खोटे बोलताना लाज वाटत नाही? महाजन पुढे म्हणाले की, मी जर एक गोष्टी सांगितली तर लोक जोड्याने मारतील. माझा अंत बघू नका, मी त्या गोष्टीचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळे करुनच बाहेर पडावे लागेल. कुण्यातरी भोंदू पत्रकाराला सांगून विषय उचलायला लावायचा, हे बरे नाही.
एका शेतकऱ्यांनी केली विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
अमरावती:-
शेतकऱ्याने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालेगाव येथे उघडकीस आली. विलास येटे वय ४१ वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून विलास चंद्रभान येटे शेतकरी मानसिक तणावांमध्ये वावरत होते त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने आणि शेतामधून पाहिजे त्या प्रमाणामध्ये पिकाचे उत्पन्न होत नसल्याने ते मानसिक तणाव मध्ये राहत असत असे बोलले जात आहे. मृताचे मामा ज्ञानेश्वर शंकर धुर्वे यांनी पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृताचे शव शव विच्छेदना करिता पाठवीले. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे विलास चंद्रभान येठे यांनी विहिरीमध्ये उड़ी घेऊन आत्महत्या केल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुलिंग मशिनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील तरुणाचा मृत्यू
आष्टी -
पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दिनांक 6एप्रिल रवीवारी संध्याकाळी चार ते साडे वाजताच्या सुमारास घडली
धीरज प्रमोद येलमुले वय 16 वर्ष रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे
मृतक धीरजच्या वडिलांचा अनखोडा येथे थंड पाणी कॅन वितरणाचा चा व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायात मुलगा धीरज मदत करत होता. रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास धीरज हा कुलिंग मशीन जवळ गेला असता कुलिंग मशीन च्या विद्युत तारेचा त्याला जोरदार झटका बसला. व तो जागेवरच कोसळला त्याला त्वरीत उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे
सात वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने केला अत्याचार, त्या नराधमास पोलीसांनी केली अटक ,कठोर शिक्षेची मागणी.
रामटेकः- येथून जवळच असलेल्या पेंढरई येथे नातेवाईकांकडे मुंडणाच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या सात वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. नराधमाचे नाव रोहीत शामसुंदर सोनवने वय २४ रा पेंढरई असे आहे. पिढित ७ वर्षीय मुलगी मुळची गुजरात येथील रहिवासी असून पेंढरई हे तिच्या आईचे माहेर आहे. आई वडील व लहान भाऊ हे संपूर्ण कुंटूब तिची आई किरण कडीया वार्ड जामनगर गुजरात येथून पिढीत नाबालीक मुलीच्या मामाच्या मुलाचे मुंडनाचे कार्यक्रमाकरिता मंगळवारी दुपारी २ चे सुमारास आले होते.
सायंकाळी ७ चे सुमारास पिढीत मुलगी दिसत नाही म्हणून तिला शोधण्याकरिता किरण व तिचे नातेवाईक शोध घेवू लागले. तितक्यात तिला नराधम आरोपी रोहीत शामसुंदर सोनवाने त्याच्या घरी घेवून गेल्याची माहिती मिळाली. गावातीलच असल्याने त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले गेले परंतू वेळ होत असल्याचे लक्षात येता शोधाशोध सुरु केली असता. आरोपी रोहीत हा त्या मुलीला स्मशान भूमीकडे घेवून गेल्याची माहिती मिळाली. त्या दिशेन शोध घेत गेले असता एका शेताला लागून असलेल्या स्मशान भूमीजवळ पिढित दिसून आली.त्यावेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते. ती ऐका शेताजवळ जखमी अवस्थेत बसून असल्याचे त्यांना दिसले. हे पाहून सर्व संतापले. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट होता. मुलीची आई किरण हिने नातेवाईकांसोबत देवलापार पोलीस ठाणे गाठले व तक्रार केली.
ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी रोहीत विरुध्द बी एन एस १३७ (२) व ६५(२) तसेच बालकांचे लैंगीक संरक्षण ४ व ६ अंतर्गत रात्री उशीरा गून्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. पोलीस कर्मचारी दिपीका भोयर (पारखी) यांनी पिडित बालिकेला नागपूरच्या मेडीकल मध्ये तपासनी करिता भरती केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ठ झाले असून पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत
एक आठवड्याच्या आत पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन - काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे
काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान,आमदार रामदास मसराम यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन.
गडचिरोली :: गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी काठावरील पाण्याची पातळी खालावली असून शेतकर्यांना शेती करायला अडचणीचा सामना करावा लागत आहे या सोबतच नदी काटावरील गावातील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी सामना करावा लागत असून पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात यावा या प्रमुख मागणीस जिल्ह्यातील इतर मागन्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली -चंद्रपूर रोड वरील वैनगंगा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास प्रामुख्याने काँग्रेस विधिमंडळ गट नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनीही उपस्थिती दर्शविली व मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क करून लवकरात लवकर नदी पात्रात पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे कळविले.
एक आठवड्याच्या आत नदी पात्रात गोसिखुर्द चे पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
यावेळी प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेस चे जेष्ठ नेते शँकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अब्दुल पंजवानी, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, भूपेंश कोलते, रुपेश टिकले, रमेश चौधरी, नितीन राऊत, वामनराव सासाकडे, दामदेव मंडलवार, दत्तात्र्यय खरवडे, अनिल कोठारे, दिलीप घोडाम, सुभाष कोठारे, नितीन राऊत, नरेंद्र गजपुरे, मुन्ना गोंगले, शालिक पत्रे, विजय सुपारे, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, जावेद खान, घनश्याम मूरवतकर, मिथुन बाबनवाडे गौरव येणप्रेड्डी वार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, अमर नवघडे, रवी मेश्राम, चंद्रशेखर धकाते सह मोठ्या संख्येने शेतकी व जिल्ह्यातून आलेले गावकरी यावेळी उपस्थित होते.
आंदोलनातील इतर मागण्या >
◆ गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.
◆ भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.
◆कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
◆मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.
◆वडसा - गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.
महिला तालूकाध्यक्षा भाजपा यांचे अवैध वाळू तस्करीचे ट्रॅक्टर जप्त - चिमूर तहसील तथा पोलीस पथकाची धडक कारवाई
चिमूर : - चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरु आहे.भाजपाच्या महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे यांचे अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जप्त केले असल्याची खात्रीपूर्वक माहीती पुढे आली आहे.
चिमूर तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी फिरते पथक व स्थायी पथक तयार करून रेती चोरट्याना पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे.दिनांक. 04/04/2025 ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पकडून चिमूर तहसील ला जप्त करण्यात आले.
हि घटना ताजी असतांनाच दुसऱ्या दिवशी दिनांक 05/04/2025 रोजी रात्रीच्या अंधारात पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील चौकात गस्तीवर असलेल्या चिमूर तहसील च्या स्थायी पथकाने तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, रवींद्र चिडे मंडळ अधिकारी, शुभम बदकी तलाठी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे व त्यांच्या पाथकांनी मिळून विना नंबर रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून सदरची ट्रॅक्टर जप्तीची कारवाई केली.
याची चर्चा संपूर्ण चिमूर तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात रंगली असून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या महिला तालूका अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच वाळू चोरीचा उपक्रम सुरु केला असेल तर लोकप्रतिनिधी यांचेकडून जनतेला न्याय कसाकाय मिळवून देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने ७ महिलांचा मृत्यू तर ३ जनी जखमी: प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर.
नांदेड:-
नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत 7 शेतमजुर महिलांचा मृत्यू झाला तर 3 शेतमजुर महीला जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने नोंद घेतली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.वसमत तालुक्यातील गुंज या गावातील 10 शेतमजुर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शेत गट क्र 201 मध्ये भुईमुग निंदनीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते. या शेतात कडघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सहीत 10 मजुर आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेत जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड (वय 35), श्रीमती पुरभाबाई संतोष कांबळे (वय 40), सटवाजी जाधव (वय 55) या शेतमजुरांचा समावेश आहे. तर मृत्तांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव (वय 35), धुरपता सटवाजी जाधव (वय 18), सिमरण संतोष कांबळे (वय 18), सरस्वती लखन भुरड (वय 25), श्रीमती चऊत्राबाई माधव पारधे (वय 45), श्रीमती सपना/मिना राजु राऊत (वय 25), श्रीमती ज्योती इरबाजी सरोदे (वय 30) या महिलांचा समावेश आहे.यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथकाचे कर्मचारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर शोध व बचाव कार्य संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचे वृत्त ऐकूण तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तातडीच्या मदतीची घोषणा केली. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये पाच लक्ष एवढे अर्थसहाय जाहीर केले.प्रधानमंत्री कार्यालयाने देखील या दुर्घटनेची त्वरेने दखल घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोबतच प्रधानमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत्तांच्या कुटुंबियांना 2 लक्ष रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने समाज मन हेलावून गेले आहे. मृत्त सात जणांमध्ये पाच महिला व दोन मुलींचा समावेश आहे. घटनाक्रम यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांचे विशेष पथक,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुन्हे यांच्यासह महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी दुर्घटनेत शोध व बचाव कामासाठी तातडीने उपस्थित झाले होते.
मुकेश कोडापे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? जनमानसात अनेक चर्चेला उधाण
एटापल्लीः तालुक्यातील जारावंडी गावात एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्रीच्या दरम्यान झालेल्या या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश लक्ष्मण कोडापे (वय 28) असे असून तो आपल्या घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर नालीच्या काठावर पडलेला आढळला. विशेष म्हणजे त्याच्यावर सायकल पडलेली होती, जी घटनास्थळी आढळली.
काल रात्री गावात अचानक अवकाळी पाऊस झाला होता आणि त्याच दरम्यान विजेचा पुरवठाही खंडित झाला होता. अंधारात काही कळण्याच्या आतच ही घटना घडली असावी, असे काहींचे म्हणणे आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली, तेव्हा गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेबाबत गावात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही नागरिकांच्या मते, हा एक साधा अपघात आहे, कारण नालीच्या काठावर सायकलसह पडलेल्या अवस्थेत मुकेश आढळला. दुसरीकडे, काही गावकऱ्यांचा असा दावा आहे की हा अपघात नसून काहीतरी घातपात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत.घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन जारावंडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली असून, आजूबाजूच्या परिसरातील लोकांचीही चौकशी केली जात आहे. मृतदेहाला छाविच्छेदना साठी सामान्य रुग्णालय गडचिरोली ला पाठवले असून त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू राहणार आहे. याबाबत अधिकृत अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, या घटनेबाबत गावात वेगवेगळ्या अफवा व चर्चा सुरू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील माहिती मिळाल्यानंतरच या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होऊ शकेल.
“प्राथमिक तपासात घातपाताचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. तथापि, मृतदेहाचे छाविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच या प्रकरणाचा खरा कारण समजेल. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही.
आपल्या घरात दरोडा पडला लाखोंचा मालमत्ता लंपास झाल्याचे कळताच घरमालकाने सोडला प्राण
मुर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हातगाव येथे काल शुक्रवार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा घालून लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना इतकी भीषण होती की, चोरीचे दृश्य पाहताच घरमालक अशोक नामदेवराव बोळे (वय ६५) यांना जबर मानसिक धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बोळे कुटुंबीय त्या दिवशी बाहेर गेले होते. संध्याकाळी परतल्यानंतर त्यांनी घर उघडले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू मिळून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. हे दृश्य पाहताच अशोक बोळे यांना तीव्र धक्का बसला आणि ते कोसळले. घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा, जो सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे, तोही तातडीने निघाला असून लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घरी धाव घेतली.
गुन्ह्याचा तपास अधिक जलद आणि प्रभावी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करून तपास सुरू करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकासह हे पथक आज मुर्तीजापूरला दाखल होणार आहे. हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.पोलीस सतर्क, पण चोरीचे प्रमाण वाढतच
गेल्या काही महिन्यांत परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन वारंवार "सतर्क रहा, जागृत रहा" असा इशारा देत असले तरीही चोरीच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. घरांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षारक्षक नेमणे आणि शेजाऱ्यांशी संपर्क ठेवणे यासारख्या उपाययोजना केल्या तर अशा घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.